स्थानिकांच्या सहकार्याने कायदेशीर मार्गाने रस्ता होणार खुला
भोर– तालुक्यात पाणंद, शीव रस्ते मोकळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.२७)बारे बुद्रुक येथील पाणंद रस्त्याची स्थळ पहाणी करण्यात आली. मागील काही वर्षापासून या पाणंद रस्त्याचा वाद आहे. यावेळी रस्ता हद्द , त्यावर झालेले अतिक्रमण, रस्ता का बुजला आहे, कोणी अडविला आहे, कोणत्या कारणाने, रस्त्यातील झाडे झुडपे, ,रस्त्याच्या आजुबाजुचे शेतकरी त्यांच्या अडचणी काय आहेत असे या पहाणी दौऱ्यात तहसीलदार नजन यांनी पाहिले. गावकऱ्यांच्या सहकार्याने वाद विवाद न करता कायदेशीररीत्या सदरचा रस्ता खुला करण्यासाठी तोडगा काढण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बारे सजाचे मंडलाधिकारी शमीर मुलाणी , ग्राममहसूल अधिकारी अमोल सुर्यवंशी , संतोष दानवले, शंकर दानवले, ज्ञानोबा दानवले, विष्णू दानवले, दशरथ दानवले, अशोक दानवले उपस्थित होते.
सध्या तालुक्यात पाणंद रस्ता व शीव रस्त्यांची पाहणी सुरू असून ज्या ठिकाणी रस्ते अडविण्यात आले आहेत,बुजले आहेत अशा ठिकाणच्या स्थळांची पाहणी करून जागामालक, आजूबाजूचे शेतकरी ,संबंधितांचे म्हणणे ऐकून ते रस्ते कायदेशीर प्रक्रियेतुन खुले करण्यात येणार आहेत. हे रस्ते मोकळे करून त्यावर जिल्हा नियोजन समितीचा निधी तसेच मनरेगातून खडीकरण डांबरीकरण यामध्ये केले जाणार आहे ,तसेच गाव नकाशातील गायब झालेले अनेक पाणंद , शीव रस्ते या अभियानातुन सुरू होणार आहेत.