लोणंदः मोटार सायकल व विहीरिवरील मोटारी चोरी करणाऱ्या टोळीचा लोणंद पोलीसांनी पर्दाफाश केला असून, पाच पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत लोणंद पोलिसांनी तब्बल १ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांच्या मोटार सायकली व शेतक-यांच्या विहीरिवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरी झाल्याबाबत गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्याबाबत पोलिसांकडून तपास सुरु होता. अखेर या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर घडणा-या गुन्ह्याबात गोपणीय खब-यांमार्फत माहिती मिळवून त्या माहीतीच्या आधारे यातील संशयित आरोपी धिरज संजय गिरी (वय २६ रा. बोरी ता. खंडाळा), अनिकेत जालिंदर येळे (वय २१ रा. ठोंबरे मळा, लोणंद), रोहित सदानंद शेळके (वय २१ वर्षे रा. निंबोडी ता. खंडाळा), ओम प्रकाश माने (वय २० वर्षे रा. वीर ता. पुरंदर जि. पुणे), जयेश आनंदा मलगुंडे (वय २६ वर्षे रा. कापडगाव ता. फलटण) , ओम मोहीते (रा. तांबवे ता. फलटण असल्याचे निष्पन्न झाले.
सासवड येथून घेतले ताब्यात
संशयित आरोपी हे सासवड ता. पुरंदर येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाने धिरज संजय गिरी, अनिकेत जालिंदर येळे, रोहित सदानंद शेळके, ओम प्रकाश माने आरोपींना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार सायकल चोरीचे २ व विहीरिवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरीचे ३ गुन्हे केल्याची कबुली दिली असून, आरोपींकडून मोटार सायकली व इलेक्ट्रीक मोटारी असा एकूण एक लाख सात हजार रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू
या गुन्ह्यातील जयेश मलगुंडे, ओम मोहीते हे आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, अभिजित घनवट, संजय बनकर करीत आहेत.