शिरवळः काल दि. ३१ अॅाक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास शिरवळ पोलीस आणि सातारा पोलीस यांनी धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. सदर कारवाई शिरवळ पोलीस आणि सातारा पोलीस यांच्या संयुक्तपणे करण्यात आली असून, पोलिसांनी या कारवाईमध्ये तब्बल अंदाजे ७० ते ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये टेबल, खुर्चा, कुलर फॅन, काऊंटर, चार चाकी, दुचाकी गाड्या तसेच हजारो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची धामधुक सुरू असून, आचारसंहिता लागू आहे. असे असताना या काळातच इतक्या मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल पोलिसांना सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये पोलिसांनी १५ दुचाकी, अंदाजे ५ ते ६ चारचाकी वाहने, ५ ते ६ लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे येथील भागात एवढी मोठी कारवाई राज्यात निवडणुकीचा माहोल असताना करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?
पुणे-सातारा जिल्ह्यातील अनेक जण या जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी येत असतात. पोलिसांकडून कारवाई केल्यानंतर जुगार अड्डे काही दिवस बंद ठेवले जातात. त्यानंतर पुन्हा ते सुरु केले जातात. तरुणांना भरकटविण्याचे काम यामुळे होत असून कुटुंबाची वाताहात होऊन, अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याचे जाळे विस्तारिलेले असून, शिरवळ पोलीस याकडे जाणीवपूर्वक लक्ष करीत तर नाहीत ना असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
जुगार अड्ड्यावर कोणाचा ‘वरदहस्त’?
पोलिसांनी रात्रीच्या सुमारास एवढी मोठी कारवाई केली. मात्र, हा जुगार अड्डा कोणाच्या वरदस्तामुळे सुरू होता. मग या अगोदर कारवाई का झाली नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सातारा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण जिल्ह्यातील बेकायदा धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा शिरवळ पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर हा जुगार अड्डा कसा सुरू होता? यावर अद्यापपर्यंत कडक कारवाई का केली गेली नाही? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फोफावलेल्या अवैध व्यावसायांकडे जातीने लक्ष घालून हे व्यवसाय बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी सातारा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केली आहे.