राजगड: राजगड तालुक्यातील वेल्हे-पानशेत रस्त्यावरील कादवे खिंडी येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे पानशेत परिसरातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
राजगड तालुक्याचा भौगोलिक दृष्ट्या वेल्हे आणि पानशेत असे दोन प्रमुख विभाग पडतात. तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय वेल्हे येथे असल्याने पानशेत परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसाठी वेल्हे येथे येणे आवश्यक असते. या रस्त्यावरून रुळे, कादवे कुरण, घोल, दापसरे, आंबेगाव, शिरकोली, निगडे मोसे, आधी या गावातील शेकडो नागरिक नियमित प्रवास करतात. पुण्यापासून जवळ असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची गर्दी असते.
दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांना मोठी असुविधा होत आहे. शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी यांच्यासह सर्वच वर्गातील नागरिक याचा फटका बसत आहे. पानशेत परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी जाणारे रुग्ण आणि गर्भवती महिलांना सर्वाधिक अडचण येत आहे.
याबाबत बोलताना तालुक्यातील तहसीलदार निवास ढाणे यांनी सांगितले की, “सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. शक्य तितक्या लवकर हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”