नसरापूर (ता. भोर) |पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ चौकात मंगळवारी (दि. ४ जून) सायंकाळी साडेसहा वाजता एक धक्कादायक प्रकार घडला. झेंडे नावाच्या युवकाने किरकोळ वादातून संतप्त होऊन हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांवर संशयाचे मळभ दाटले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, झेंडे हा बुलेट दुचाकीवरून जोरजोरात आवाज करत व आरडाओरडा करत चौकातून जात होता. स्थानिक नागरिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, तो अधिकच आक्रमक झाला. संतप्त झेंडेने एका व्यक्तीच्या डोक्यावर बंदूक ठेवून धमकी दिली आणि नंतर हवेत गोळी झाडून परिसरात खळबळ उडवून दिली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जागरूक नागरिकांनी तात्काळ धाडस दाखवत झेंडेला पकडले व राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, काही तासांतच हे प्रकरण ‘शांत’ झाल्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर कायद्याचा धाकच उरणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
यामध्ये काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहभागाची शंका उपस्थित केली जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून पारदर्शकतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.