नसरापूर (ता. भोर) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विरवाडी येथील श्री राम मंदिरात रविवारी (३ ऑगस्ट) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १४० बाटल्या रक्तदान होऊन परिसरातील युवकांनी समाजहितासाठी मोठी कामगिरी केली.
या उपक्रमाचे आयोजन सचिन (आण्णा) बांदल आणि मा. कुलदिप तात्या कोंडे युवा मंच भोर-राजगड-मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
रक्तदान शिबिरासाठी अक्षय ब्लड बँक पुणे यांचे तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी सांभाळली. या शिबिरात कुलदीप कोंडे, प्रवीण धावले, अमोल पांगारे, बाबू तात्या कदम, सतीश शिळमकर, विकास सोंडकर, नितीन इंगुळकर, गणेश धुमाळ, नवनाथ गायकवाड यांच्यासह अनेक युवक व महिला उत्साहाने सहभागी झाले.
ग्रुप ग्रामपंचायत विरवाडी-दिडघर-केतकावणे हद्दीतील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला पाठिंबा दिला. रक्तदानासाठी सकाळपासूनच गावात उत्साही वातावरण दिसून आले.
युवा मंचचे मार्गदर्शक कुलदिप तात्या कोंडे म्हणाले, “रक्तदान हेच खरे जीवनदान आहे. समाजातील प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे. रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी हा साठा उपयोगी पडणार असून, हीच खरी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली आहे.”
स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी या यशस्वी उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशाच सामाजिक कार्यक्रमांची परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.