भोर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील भोंगवली–कामथडी गटात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. गेली चार दशके कार्यरत असलेले आणि जनसंपर्कात निपुण म्हणून ओळखले जाणारे राजगड साखर कारखान्याचे संचालक किसनराव उर्फ के. डी. भाऊ सोनवणे यांनी यंदा आपल्या वारसदाराला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या चिरंजीव महादेव किसनराव सोनवणे यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून “यावेळी कोणत्याही परिस्थितीत माघार नाही” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
महादेव सोनवणे यांनी भारतीय जनता पक्षाकडे अधिकृत उमेदवारीसाठी मागणी केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांनी गटातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य आणि मतदार यांच्याशी संपर्क साधून गाठीभेटी घेतल्या आहेत. भोंगवली, कामथडी, मळवंड, आळे, सापे, पाटणखिंडी या गावांमध्ये त्यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर के. डी. भाऊ सोनवणे म्हणाले, “गेल्या चाळीस वर्षांपासून मी इतरांना पुढे करून काम केले, पण आता माझा वारसदार लोकसेवेसाठी पुढे करायचा ठरवले आहे. महादेव हा तरुण, शिक्षित आणि समाजकारणात रस असलेला कार्यकर्ता आहे. गावोगावी लोक सांगत आहेत — ‘भाऊ, यावेळी तुमचा मुलगा उभा करा; आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत!’”
भाजपचे माजी आमदार संग्राम थोपटे, ज्येष्ठ नेते जीवन कोंडे, बाळासाहेब गरुड, संतोष धावले यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवणे यांची टीम सध्या सक्रीय प्रचारात आहे. “पक्ष आमच्यावर विश्वास दाखवेल, आणि आम्ही विजयासाठी पूर्ण तयारीत आहोत,” असे महादेव सोनवणे यांनी सांगितले.
डिसेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता असून, त्याआधीच गटात प्रचाराचे वारे अधिक वेगाने वाहू लागले आहेत. बाहेरगावी रोजगारासाठी गेलेले मतदारही सोशल मीडियाद्वारे सोनवणे परिवाराला साथ देत आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, के. डी. भाऊंचा जनाधार आणि महादेव सोनवणे यांची तरुणाई यांचा संगम भाजपसाठी भोंगवली–कामथडी गटात मजबूत किल्ला ठरू शकतो.

















