भोरः भोर विधानसभा क्षेत्रावर शरद पवार गट वगळता सर्वच राजकीय पक्षातील प्राबल्य असणाऱ्या इच्छुक नेते मंडळीनी दावा केल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारासंदर्भात मोठा पेचप्रसंग उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उबाठा गटाने खा. सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे नाव जाहीर केल्यामुळे नाराजी व्यक्त करीत या जागेवर उबाठाने दावा केला आहे.
यातच आता भाजपने देखील या मतदारसंघावर दावा केला असून, तालुका अध्यक्षांनी या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांची भेट घेतली आहे. यामुळे आता रांगेत असणाऱ्या इच्छुक वा प्राबल्य असणाऱ्या कोणत्या नेत्याचे नाव महाविकास आघाडीकडून जाहीर केले जाणार, तर महायुती कोणत्या नेत्याच्या नावावर शिकामोर्तेब करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत भोर विधानसभा मतदारसंघावर दावा करीत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. यावेळी भोर विधानसभेची जागा भाजपाला मिळावी, अशी मागणी त्यांनी फडणवीसांकडे केली आहे. या मतदार संघात भाजप सरकारच्या काळात हजारो कोटींचा निधी खर्चून अनेक विकास कामे होत असल्याने, ही जागा भाजपाला मिळावी अशी विनंती फडणवीसांना विनंती करण्यात आली आहे. जीवन कोंडे हे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार असल्याची माहिती मिळत आहे.
इच्छुक अनेक पण संधी नेमकी कोणाला मिळणार?
भोर विधानसभा मतदारसंघ हा गेले अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथे काँग्रेसचे संग्राम थोपटे हे विद्यमान आमदार आहेत. थोपटेंच्या विरोधात लढण्यासाठी महायुतीकडून भाजपचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेनेचा २ उबाठा 1 असे उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे संधी महायुतीकडून संधी कोणाला मिळणार हे पाहावे लागणार आहे.
‘ही’ आहेत इच्छुकांची नावे
काँग्रेसः विद्यमान आमदार संंग्राम थोपटे
भाजपः जीवन कोंडे, किरण दगडे
राष्ट्रवादीः रणजित शिवतरे, विक्रम खुटवड
शिवसेनाः कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदेरे
शिवसेना उबाठाः शंकर मांडेकर
सुप्रिया सुळेंचे ते वक्तव्य संग्राम थोपटेंसाठी घातक ठरणार का?
मागील लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटेच असतील, असे वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी धुसपुस निर्माण झाली होती. याचनंतर उद्धव बाळासाहेब गटातील कुलदीप कोंडे यांनी निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केला. पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी वेल्हा तालुक्यातील एका सभेमध्ये आमचा ठरलंय म्हणत संग्राम थोपटे हेच उमेदवार असतील, असे वक्तव्य केले होते. यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये नाराजी पसरली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यामुळे आता हे सर्व पाहता सुप्रिया सुळेंचे वक्तव्य संग्राम थोपटे यांच्यासाठी धोकादायक ठरतात का हे पाहणे लागणार आहे.