पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
कोंढव्यातील मिठानगरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) छापा टाकून बेकायदेशीर बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा पर्दाफाश केला आहे. नौशाद अहमद सिद्धीकी (वय 32, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेली माहिती अशी की, भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल गुप्तचर यंत्रणेला समजू नयेत यासाठी बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा वापर केला जात होता.
मीठानगर येथील एमए कॉम्प्लेक्स परिसरात हे टेलिफोन एक्सचेंज सेंटर चालवले जात होते. आरोपी नौशाद याच्यावर तपास यंत्रणांची आधीपासून करडी नजर होती. तो काही महिन्यांपूर्वी राजस्थानला गेला होता. त्याला ठाणे पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. त्याचा ताबा एटीएसकडून घेतला जाणार आहे. त्याने राहत्या घरातच हा सर्व सेटअप तयार केला होता. राजस्थानला जाण्यापूर्वी त्याने हे सर्व साहित्य काढून घरातच ठेवले होते. एटीएसला याबाबत खबर्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती एटीएसकडून देण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्या नौशादकडे चौकशी सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात संभाव्य घातपात घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि तपास यंत्रणा चांगल्याच सतर्क झाल्या आहेत.