निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त
भोर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोरमधील रामबाग नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी सुरू झाली आहे.
यामध्ये वाहनांचे चित्रीकरण केले जात आहे, वाहनांची डिकी, सर्व बैठक व्यवस्था ,वाहनात असणाऱ्या बॅगा तपासल्या जात आहेत वाहनात अवैध रोकड, रोख रक्कम आहे का ते तपासून वाहने पुढे सोडली जात आहेत. निवडणूक काळात पैसे वाटण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे भरारी ,स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. ही तपासणी पारदर्शकतेने संपुर्ण निवडणूक काळात होणार आहे. रामबाग नाक्यावर शिरवळ, सातारा,पुणे,वाई, महाबळेश्वर ,मांढरदेवी,महाड तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते त्यामुळे या नाक्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची कडेकोट तपासणी केली जात आहे. ही तपासणी चोवीस तास असुन या करीता सर्व्हेक्षण पथक प्रमुख अजित वाल्मिक, सहाय्यक दत्तात्रय कापरे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार दराडे,व छायाचित्रण करण्यासाठी औदुत समगिर कार्यरत आहेत.