मतदान जनजागृती अभियान ; जो देश करील १००% मतदान तोच देश होईल महान
भोर – भोरला तालुक्यातील सर्व सहकारी संस्था ,सोसायटी पतसंस्था, पगारदार शिक्षक संस्था,गृहनिर्माण संस्था यांनी मतदान जागृतीसाठी सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार(दि.५) लोकशाही सक्षम आणि सशक्त करण्यासाठी मतदान हक्क बजावण्याची शपथ सहाय्यक निबंधक कार्यालय राजवाडा येथे घेण्यात आली.
” माझे आणि माझ्या संस्थेच्या कुटुंबाचे भविष्य देशाच्या मजबूत लोकशाहीच जोडलेले आहे .आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू .या निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश ,जात ,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू तसेच आमच्या संस्थेच्या कुटुंबातील सर्व मतदार नातेवाईक मित्रपरिवार, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करू .” अशा प्रकारची शपथ सर्व सोसायटी, पतसंस्था यांनी जागरूकता आणि सामाजिक सद्भावना यांच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी घेत स्वीकारली. यावेळी भोरचे सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे, संजय पवार, अविनाश कांबळे,अंकुश शिंदे,केशव पवळे ,संजय भेलके व भोर शहरातील पतसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
“मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे.”
बाळासाहेब तावरे -सहाय्यक निबंधक भोर