भोरः राज्य सरकारने राज्यातील देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे गोसेवक अमित दादा गाडे पाटील, विर धाराऊ माता गोशाळा ट्रस्ट शंभूतीर्थ कापुरव्होळ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. त्या संबंधीची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करुन सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे आभार मानण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील आभार मानण्यात आले आहे.
प्राचीन काळापासून गायींचे महत्व अधिक
आपल्या सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या शासन आदेशातील भाग: प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे संबोधण्यात येत असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धत, सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट चिंताजनक बाब ठरत आहे. त्यामुळे देशी गायींचे पालनपोषण करण्यास पशुपालकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.