भोरः रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदीर आणि परिसराचा सातबारा हा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने आपल्या नावावर करून घेतला असल्याचा आरोप करीत तो रद्द करावा आणि तत्कालीन तहसीलदार आणि रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे तालुका उपाध्यक्ष आणि आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर यांनी उपोषणाची हाक दिली आहे. यावर आता अशोक विठ्ठलराव थोपटे मानद, सचिव रायरेश्वर डोंगरी विकास परिषद यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.
या पत्रकात त्यांनी अगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा केवळ राजकीय स्टंट केला असल्याचे म्हणत उपोषणकर्त्यास कायदेशीर नोटीस देऊन अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे म्हटले आहे. रायरेश्वर किल्ल्यावरील जमीनीच्याबाबत उपोषण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ राजकीय स्टंट आहे. हे उपोषण कोणत्याही कागदपत्रांचा अभ्यास व शहानिशा न करता केलेले उपोषण आहे. रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेची स्थापन 1991 मध्ये झाली असून संस्थेचा उध्देश हा केवळ सामाजिक विकास आहे.
समाज हितासाठी काम करणारी संस्था
त्यामध्ये डोंगरी विभाग, शिक्षण संस्था, डोंगरी विभागाचा विकास, सामाजिक व आर्थीक उन्नती व शेती उद्योग धंद्यांमध्ये मदत व इतर योजना राबवणे, मागासलेपणा व अविकसित भागांसाठी मदत, खादी ग्रामोद्योग योजना, विविध उद्योगांना प्राधान्य, ग्रामीण उद्योगांना प्राधान्य, आश्रमशाळा बांधणे व त्या चालविणे, गरीब मुला-मुलींच्या शिक्षणास प्राधान्य देणे, पर्जन्य, दुष्काळ, नैसर्गिक संतुलन, डोंगरी दुर्गम भागात तसेच ग्रामीण भागांकरिता जनहितांसाठी सेवाभावी काम करणे, सामाजिक वनीकरण करणे आदी कामे हा या संस्थेचा मुख्य उध्देश सांगण्यात आला आहे.
बक्षीपत्र स्वरुपात नोंदी
उपोषणकर्त्याच्या मागणीमध्ये तत्कालीन तहसिलदार व माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची सखोल चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुळात श्रीमंत चिंतामणराव सदाशिवराव पंतसचिव श्रीमती उमादेवी नागनाथ पंतसचिव यांनी दिलेले बक्षीसपत्र हे १९९१ मध्ये दुय्यम निबंधक, भोर यांच्याकडे नोंदणीकृत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यानुषंगाने फेरफार नुसार सातबारावर नोंदी झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
नियमानुसारच बक्षीपत्र जमिन संस्थेला दिली
सदर सातबाराची नोंद मा. मंत्री अनंतराव थोपटे यांनी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेतर्फे बोगस नोंद केली आहे ती तात्काळ रद्द करुन संबंधितांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. यावर सदरची जमीन नियमानुसार नोंदणीकृत बक्षीसपत्राने संस्थेस दिलेली असून त्याची फेरफारनुसार सात बारावर नियमाने नोंद झाली आहे व बक्षीपत्रातील अटी व शर्तीनुसार बहुतांशी जमीन कुळ वहिवाटदारांना परत दिलेल्या असल्याचे म्हटले आहे.
जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न
तसेच त्याबाबत संस्थेने कोणतीही हर हरकत घेतलेली नाही, त्यामुळे उपोषणकर्त्यांच्या या मागणीमध्ये कोणतेही तथ्य नसून मा. मंत्री अनंतराव थोपटे यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचा व त्यांना वयाच्या 93 व्या वर्षी मानसिक त्रास देण्याचा जाणीवपूर्वक उपोषणकर्ता प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्या आला आहे.
पुरातन मंदिराबाबात आराखडा तयार
यापूर्वी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने मंदीर व मंदीर परिसर तसेच शिवस्मारक संग्रहालय याकरीता नाशिकचे आर्किटेक्ट देशपांडे यांच्याकडून आराखडा तयार केला होता. त्यावर आजपर्यंत अनेक सामाजिक संस्था तसेच शिवभक्त यांनी वेळोवेली विकासाचे प्लॅन व नकाशे तयार केले आहेत. तसेच मा. खासदार श्री छत्रपती संभाजीराजे महाराज, कोल्हापूर यांनी देखील या पुरातन मंदिराबाबत आराखडा तयार केला आहे, अशी माहिती मिळत आहे.
उपोषणकर्त्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार
पुरातत्व व पर्यटन विभागामार्फतही संस्थेने वरील विषयानुसार शासनाच्या विविध योजना मंजूर केल्या आहेत. मंजूर करण्याबाबत देखील संस्था प्रयत्नशिल आहे. याकामी मा. मंत्री अनंतराव थोपटे व आमदार संग्राम थोपटे सातत्याने प्रयत्नशिल आहेत. सदर रायरेश्वर मंदिराबाबतचा नाहक विपर्यास करुन समाजामंध्ये गैरसमज पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. उपोषणकर्त्यास हा जुना इतिहास माहित नाही. कदाचित त्यांचा जन्म होता किंवा नाही हे देखील सांगता येत नाही. या विषयी उपोषणकर्ते हे संस्थेची व अनंतराव थोपटे यांची नाहक बदनामी करीत असून उपोषणकर्त्याविरुध्द संस्था योग्य ती कायदेशीर नोटीस देणार असून याबाबत अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.