भोर : तालुक्यातील राजकारणात मोठा भूकंप झाल्याची चर्चा आज सर्वत्र घोंगावत आहे. ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख आदित्य बोरगे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांचा झालेला हा मोठा पक्षप्रवेश म्हणजे फक्त निष्ठा बदल नाही, तर महामार्ग पट्ट्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी तयार झालेले महत्त्वपूर्ण समीकरण मानले जात आहे.
भोर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत या प्रवेश सोहळ्याचे रूपांतर मोठ्या शक्तीप्रदर्शनात झाले. व्यासपीठावर जयघोषात आदित्य बोरगे यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, संग्राम थोपटे, बाळासाहेब गरुड, शेखर वडणे, जीवन कोंडे यांसह भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आदित्य बोरगे यांच्याबरोबर ॲड. संभाजी यादव (सरपंच देगाव), विद्याताई यादव (मा. सरपंच देगाव), अजित बाबा चंदनशिव, तुळशीराम थिटे, अक्षय बोरगे, चेतन बोरगे, तानाजी खाटपे, उमेश गायकवाड, शांताराम शिंदे, दत्ताभाऊ बोरगे, कुंडलिक बोरगे, नागेश बोरगे यांसह अनेक तरुण कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्या या ताकदवान प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, कार्यकर्त्यांच्या पातळीवर अस्वस्थता वाढू लागली आहे.
युवासेनेत सक्रिय कार्य करताना आदित्य बोरगे यांनी महामार्ग पट्ट्यातील परिसरात भक्कम संघटन उभी केली होती. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचे महत्त्व आणखी वाढले आहे. मागील काही महिन्यांपासून तालुक्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना, बोरगे यांच्या प्रवेशाने या प्रक्रियेला आता अधिक वेग मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
प्रवेशानंतर बोलताना बोरगे म्हणाले,
“तालुक्याचा सर्वांगीण विकास, तरुणांना संधी आणि विश्वासार्ह नेतृत्व यासाठी आम्ही भाजपची वाट निवडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
भाजपने बोरगे यांच्या प्रवेशाचे स्वागत करत, आगामी निवडणुकांमध्ये महामार्ग पट्ट्यातील समीकरणे भाजपच्या बाजूने फिरतील असा दावा केला आहे. तर विरोधकांच्या गोटात चिंता वाढू लागली असून, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारी, संख्याबळ आणि रणनीतीमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत स्पष्टपणे जाणवत आहेत.

















