भोर : आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात राजकारणाचा खेळ उघड उघड सुरू झाला आहे. सत्तेच्या हव्यासाने पछाडलेले नेते आता यात्रांच्या, देवदर्शनांच्या आणि दिवाळी भेटींच्या नावाखाली मतदारांची दिशाभूल करत आहेत. विकास, जनतेच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्ते आणि पाण्याच्या समस्या — हे सगळं सध्या बाजूला सारलं गेलं आहे.
राजकारण्यांनी मतदारांना फसवण्यासाठी नव्या नव्या युक्त्या लढवल्या आहेत. काही जण भेटवस्तूंच्या नावाखाली पैशांची उधळण करत आहेत, काही जण धार्मिक कार्यक्रमांमध्ये आशीर्वाद मागण्याच्या बहाण्याने आपली राजकीय शक्ती दाखवत आहेत. हे सर्व पाहता, तालुक्यातील राजकारण आता सेवा नव्हे तर “स्वार्थाचा मेळावा” झाल्याचं स्पष्ट दिसतंय.
जनतेच्या पैशावर निवडणुकीच्या अगोदर कार्यक्रमांची आतषबाजी सुरू आहे. रस्त्यांवर दिवे लागलेत, पण गावकऱ्यांच्या जीवनात अजूनही अंधार आहे. काही गावांत रस्ते मोडकळीस आलेत, पाणीपुरवठा ठप्प आहे, पण नेतेमंडळींना मतांचा आकडा आणि सत्ता हवीय, विकास नाही.
भोर तालुक्यातील मतदारांनी आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे. यात्रांमधील दर्शन नव्हे, तर जनतेच्या विकासाचं ‘दर्शन’ घडवून दाखवणारा नेता ओळखणं गरजेचं आहे. सणासुदीच्या निमित्ताने लाडू-पेड्यांचा डोंगर दाखवणारे नेते निवडणुकीनंतर गावाकडे पाहतील याची खात्री कोण देणार?
आता मतदारांनी ठरवावं — आमिषांना बळी पडायचं की वास्तव विकासासाठी उभं रहायचं. राजकारण्यांनी जनतेचा विश्वास विकत घेण्याचा हा नाट्यप्रपंच थांबवावा, नाहीतर या वेळेस मतदारच उत्तर देतील — थेट मतदान पेटीतून!
🗞️ राजगड न्यूजची नवीन मालिका — “खेळ खुर्चीचा” सुरू!
आजपासून राजगड न्यूज कडून “खेळ खुर्चीचा” ही नवीन मालिका सुरू होत आहे.
या मालिकेत राजकारणातील ढोंगीपणा, जनतेची फसवणूक, आणि मतदारांची दिशाभूल यावरून पडदा उचलला जाणार आहे.
सत्ता आणि खुर्चीसाठी सुरू असलेला हा राजकीय तमाशा, त्यामागील खरे चेहरे आणि नाट्य — हे सर्व उघड करण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जाणार आहे.
जनतेच्या मनातील प्रश्नांना आवाज देत, खरी माहिती आणि वास्तव समोर आणणे हेच या मालिकेचे उद्दिष्ट आहे.
राजकारण्यांच्या गोटातील “खेळ” उघड करणारी ही मालिका दररोज राजगड न्यूजवर वाचा.
✍️ संपादक — जीवन अरुण सोनवणे
📍राजगड न्यूज | सत्यासाठी कटिबद्ध


















