भोरः येथील वरवे गावात उल्हास शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा १९९१ सालापासून स्थित आहे. या शाळेत आजवर अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे गिरवून मोठ्या पदावर कार्यरत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शाळा आणि गावकऱ्यांमध्ये शाळेच्या जमिनीवरून वाद सुरू झाला असून या वादाची झळ शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोसावी लागत आहे. याची प्रचिती आज दि. ९ नोव्हेंबर रोजी दिसून आली. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यी शाळेत आल्यावर गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेतून घरी हाकलून दिले. तसेच शाळेतील वर्ग खोल्यांना ग्रामस्थांनी टाळे ठोकले. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे
उल्हास शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा वरवे गावात असून या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या 316 असून शिक्षक कर्मचारी 15 आहेत. देवस्थाने दिलेल्या जागेवर शिक्षण संस्थेचा सातबारा असून त्या जागेचा कोणताही गैरवापर आम्ही करत नसून केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही जागा वापरत असल्याचा दावा शिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी केला आहे.
शाळेच्या नावावर एकूण ६० गुंठे जागा असून पैकी काही जमीन वापरात नाही. भैरवनाथ देवसंस्थानाने ही जागा संस्थेला बक्षीस स्वरुपात दिलेली आहे. पण काही जागा वापरात नसल्याने ती जागा देवसंस्थान ट्रस्टच्या नावावर करण्यासाठी हे प्रकरण गेल्या १५ ते २० वर्षांपासून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे निकाली काढण्यासाठी प्रलंबित आहे. यावरुनच संस्था आणि गावकरी यांच्यात वाद सुरू झाला असून गावकऱ्यांनी या प्रकरणी रोष व्यक्त करीत शाळेला कूलूप लावले. गेल्या अनेक वर्षांपासून ३० गुंठे जमीन शाळेने स्वःताच्या नावे करुन उर्वरित जमिन ट्रस्टच्या नावे करावी, अशी मागणी गावकऱ्यांची आहे. या प्रकरणी शाळा आणि गावकऱ्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात यावा, असे असताना देखील शाळेच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने सदर गोष्टी करावी लागली असे गावातील नागरिक सांगत आहेत.
आक्रमक निर्णयाची झळ विद्यार्थ्यांना
सदर जागेवरून शाळा, वरवे गावातील ग्रामस्थ आणि ट्रस्ट यांच्यात वाद चांगलाच उफाळून आला असून या शाळेत आसपासच्या गावातील विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळा बंद केलेल्या आक्रमक निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यामुळे वादाची झळ विद्यार्थ्यांना का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
राजकीय हेतू बाळगून शाळेला टाळे ठोकण्यात आलेले आहे आणि शाळेची बदनामी करण्याचे काम केलं जात आहे. याबाबत आमचा कोणताही संबंध नसताना आम्हाला नाही त्रास दिलेला आहे असाच त्रास होत राहिला तर आम्ही शाळा या ठिकाणची बंद करणार आहोत. होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला सर्वस्वी गावकरी जबाबदार असतील.
विलास बांदल ,संस्थेचे अध्यक्ष
सदर शाळेचा आणि देवस्थान ट्रस्ट यांचा कोणत्याही प्रकारचा वाद नाही. देवस्थानने शैक्षणिक संस्थेसाठी त्यांना बक्षीस पत्राने जागा दिलेली आहे. आज झालेल्या प्रकाराबाबत आम्हाला कोणत्या प्रकारची माहिती नाही आणि यामध्ये देवस्थान ट्रस्टचा कोणत्या प्रकारचा संबंध नाही.
नामदेव कोंडे (भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष)
संस्था चालकांनी सांगितले होते की ही जागा फिरवून देतो. ही जागा शाळेला बक्षीसपत्र करुन देण्यात आली होती. ती जागा आता फिरवून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ग्रामस्थ व ट्रस्टच्या माध्यमातून शाळेला टाळे ठोकून शाळा बंद करण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतला आहे. सदर जागा ही आम्हाला परत फिरवून द्यावी. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. विद्यार्थ्यांना पर्यांयी जागा शाळेने उपलब्ध करून द्यावी.
आशिष भोरडे (सरपंच वरवे)
आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गावातील नागरिकांनी बैठक घेऊन शाळेला कुलूप लावले. तसेच हे करण्यापूर्वी शाळेच्या प्रतिनिधींना फोन करण्यात आला होता. त्यांनी फोन उचलला नसल्याने ही गोष्ट करण्यात आली असून आमचीही मुले या शाळेत शिकत आहेत. पण नाईलाज म्हणून ही गोष्ट करणे भाग पडले असून, आता या प्रकरणी जिल्हाधिकारी पुणे व इतर ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आला असून, मीटिंगला शाळेच्या प्रतिनिधींनी हजर राहून गावकऱ्यांना शब्द द्यावा यानंतरच शाळा सुरू करण्यात येईल.
गावकरी वरवे