भोर – भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पसुरे (ता.भोर) येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सिंबॉयसीस युनीव्हर्सिटी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र लवळे, रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल, कम्युनिटी आय केअर फाउंडेशन पुणे, एम.पी.एन. हॉलीडे क्लब पसुरे आणि श्री.वाढेश्वर देवस्थान ट्रस्ट पसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.८) रोजी झालेल्या सर्वरोग निदान व नेत्र तपासणी आरोग्य तपासणी शिबिरात २३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिरात शालेय विद्यार्थी, महिला व पुरुषांसाठी सर्व रोग निदान व नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये १८ मुले, २४ मुली, ३८ महिला व ३८ पुरुष अशा ११८ जणांची नेत्र तपासणी तर २६ मुले, ३१ मुली, ४५ महिला व १८ पुरुष अशा १२० जणांची वेगवेगळ्या आजारावरील तपासणी करण्यात आली. एकूण २३८ जणांची तपासणी सिंबायोसिस हॉस्पिटल व कम्युनिटी आय केअर यांच्या मार्फत केली. तपासणी केलेल्यांना गरजेनुसार उपचार व शस्त्रक्रिया नामांकित रुग्णालयात मोफत केली जाणार आहे. तर नेत्र तपासणीतील लाभार्थ्यांना पुढील एक महिन्यात मोफत चष्मे वाटप केले जाणार आहेत. या शिबिरासाठी प्रयत्न केलेले एमपीएन हॉलिडे क्लबचे प्रमोद कुमार भल्ला, रोटरी क्लब ऑफ पुणे सेंटरच्या लेखा नायर व वाढेश्वर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक मानसिंग धुमाळ, सचिव संपत देशमुख, विश्वस्त दत्तात्रेय धानवले, चंद्रकांत खोपडे, चंद्रकांत कुरंगवडे, विशाल सुरेश धुमाळ, जितेंद्र धुमाळ, नंदकुमार तारु, पोपट धुमाळ, विजय धुमाळ, विद्या सरट, शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, प्रमोद कुमार भल्ला यांचेकडून शालेय मुलींसाठी सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. मुलामुलींच्या २० वर्षांपर्यंत होणाऱ्या आजारावर नियोजन करुन उपचाराचे नियोजन करण्यात येणार आहे. निदान झालेल्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असून सातत्याने वर्षातून किमान दोन शिबिर घेण्यात येतील तसेच या शिबीरासाठी विद्यार्थ्यांसह या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असे मानसिंगबाबा धुमाळ यांनी सांगितले.