भोर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनशी संलग्न असलेल्या भोर तालुका नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी पिसावरे (ता. भोर) येथील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. दिपक वसंत चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने तालुक्यातील कायदेशीर व नोटरी विषयक कार्यक्षेत्रात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील नोटरींच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या अंतर्गत भोर तालुका पातळीवर असोसिएशनची पुनर्रचना करण्यात आली. या वेळी सदस्यांच्या एकमताने अध्यक्षपदी ॲड. चौधरी यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच, पुणे जिल्ह्याचे नोटरी सचिवपद ॲड. सुरेश शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले.
या निवडीचे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर, कार्याध्यक्ष ॲड. यशवंत खराडे आणि सचिव ॲड. प्रविण नलावडे यांच्या हस्ते ॲड. दिपक चौधरी यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये पुणे जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कल्याण शिंदे, भोर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संतोष बाठे, ॲड. विजय दामगुडे, ॲड. राजेंद्र मोरे, ॲड. शिवाजी पांगारे, ॲड. शिवाजी मरळ, ॲड. कल्पना म्हस्के, ॲड. राजेशकुमार बारटक्के, ॲड. यशवंत शिंदे, ॲड. मधुकर साळवे, भूषण कोकरे, श्रीकृष्णा ढेकळे, अनिकेत चव्हाण, मनाली चौधरी आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. दिपक चौधरी यांनी यापूर्वीही विविध सामाजिक व कायदेशीर पदांवर काम करत भोर विभाग विकास सोसायटीचे अध्यक्ष, भोर बार असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच रुग्ण कल्याण समिती सदस्य म्हणून आपली सेवा दिली आहे. त्यांचा अनुभव, नेतृत्व क्षमता आणि कायदा क्षेत्रातील योगदान लक्षात घेता ही निवड निश्चितच योग्य आणि प्रभावी ठरणार आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
निवडीनंतर ॲड. चौधरी यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत, “नोटरींच्या समस्या, गरजा आणि सन्मानासाठी कटिबद्ध राहून काम करेन,” असे सांगितले.