भोर – नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेतील पैशाच्या अपहार प्रकरणी सात जणांनी जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अ.स. वाघमारे यांनी फेटाळला आहे.
नेरे विभाग पतसंस्थेत अध्यक्ष, संचालक, कर्जदारांनी ३९ कोटी ८७ लाख ९७ हजार ७१७ रुपयांचा अपहार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सहकारी संस्था पुणे येथील द्वितीय विशेष लेखापरीक्षक यांनी पोलिसांकडे जूनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये ११२ जण असून, पतसंस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक आणि मोठे कर्जदार अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेतील ४६८३ ठेवीदारांना पैसे परत करावयाचे आहेत. ३९ कोटी ८७लाख ९७ हजार ७१७ रूपयांची ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. सर्व रक्कम वसूल करण्यासाठी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. विजय रामचंद्र धुमाळ, नामदेव विठ्ठल कोंढाळकर, सुनील दत्तात्रय खोपडे, शिवराज शामराव खोपडे, विजय श्रीपती धुमाळ, संभाजी शामराव खोपडे, पंढरीनाथ रामचंद्र धुमाळ यांनी पुणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी जामीन अर्ज फेटाळला. संबंधित अर्ज फेटाळल्याने ठेवीदारांच्या हिताचा निर्णय झाला असल्याची चर्चा सुरू आहे.
भोर, राजगड (वेल्हे )तालुका, पुणे, सातारा येथील राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, व्यापारी यांचा त्यामध्ये समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार, फसवणूक, बेकायदेशीर गैरव्यवहार झाल्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. सुरुवातीस कर्जदारांकडून कागदपत्रकांची पुर्तता न करता, कर्जदाराची पात्रता नसतानाही बेहिशोबी अव्वाच्या सव्वा मोठं मोठी तारणी कर्जे दिली गेल्याने व ठेवीदारांना मोठ्या व्याजदराचे आमिष दाखवून या कर्जांसाठी ठेवी गोळा करून कर्ज फक्त वाटप केल्याने ही संस्था अडचणीत आली आहे. या संस्थेने गुंतवणूकीकडे लक्ष न देता ठेवी , कर्जे यांचा समतोल साधला नाही. या संस्थेवर प्रशासक असुन, शासकीय लेखापरीक्षण झाले असून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मार्फत तपासणी सुरू आहे.भोर शहरात अनेक पतसंस्था असुन या संस्थेत झालेल्या अपहारामुळे नागरिकांचा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.
दरम्यान वसुल झालेल्या कर्जातुन काही प्रमाणात सामान्य ठेवीदारांना पैसे परत केले आहेत. मोठे ठेवीदार मात्र अजूनही आपली ठेव कधी मिळणार याकडे कटाक्षाने लक्ष ठेवून बसले आहेत.