भोर : भोर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून प्रचारमोहीम वेगाने पुढे सरकत आहे. मात्र, मतदारांना विकास आराखडा, भविष्यातील योजना किंवा मूलभूत सुविधांचं चित्र दाखवण्याऐवजी उमेदवार व नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
नगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्यात या वेळी कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. जाहीर सभा, प्रभागस्तरीय भेटी तसेच सोशल मीडियावरून नेते व कार्यकर्ते एकमेकांवर थेट निशाणा साधत आहेत. भोरच्या राजकारणात कायम चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेले माजी आमदार संग्राम थोपटे व विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या मतभेदांना पुन्हा उधाण आल्याचे चित्र आहे.
गोळीबार, मडके, जुगार, सावकारकी यांसारखे विषय पुढे करून उमेदवारांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू असून प्रत्येक सभेत प्रत्युत्तरांची साखळीच पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराचा फोकस विकासाऐवजी वैयक्तिक टोमणे आणि पक्षीय संघर्षावरच केंद्रित झाल्याची नाराजी नागरिकांत व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज समस्या, आरोग्य सुविधा, रस्ते-दिवे-खांब, रोजगार संधी आणि पर्यटन विकास यांसारखे जीवनावश्यक प्रश्न अद्यापही चर्चेत आलेले नाहीत. “निवडणूक म्हणजे विकासाचा रोडमॅप दाखवण्याची वेळ असते; परंतु आरोपांच्या धुराने खरा मुद्दा झाकोळला जात आहे,” अशी भावना स्थानिक व्यावसायिक, तरुण आणि समाजघटकांकडून व्यक्त केली जात आहे. या वातावरणामुळे सर्वसामान्य मतदार संभ्रमात असल्याचे दिसते.
भोर शहरात विकासासाठी भौगोलिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्र, कृषी-उद्योग, पर्यटन, IT पार्क आणि पायाभूत सुविधा यांसाठी योग्य धोरण राबविल्यास शहराचा कायापालट होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. मात्र, या संधींच्या दिशेने कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप स्पष्ट आराखडा मांडलेला नाही.
निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा जवळ येत असताना मतदार आता थेट प्रश्न विचारू लागले आहेत —“या वेळी भोरचा खरा विकास करणारा नेता कोण?”आणि “पक्षापेक्षा कामांना प्राधान्य देणार का?”
आगामी काही दिवसांत प्रचाराची दिशा बदलते का आणि टीका-टिप्पणीच्या पलिकडे जाऊन विकासाचा ठोस मसुदा मतदारांसमोर ठेवला जातो का, हेच निवडणुकीच्या पारड्याचा तोल ठरवणारे ठरणार आहे.













