भाटघर धरणातील मत्स्यपालन व्यवसाय ठरत आहे डोकेदुखी
भोर :– भोर तालुक्यातील भाटघर(येसाजी कंक जलाशय) धरणाच्या परिसरातील पाण्याला अचानक हिरवा रंग चढल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बॅक वॉटर क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी व नऱ्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्यात हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.
या प्रकारामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या परिणामकारकतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

भाटघर धरण अभियंता गणेश टेंगले यांनी यासंदर्भात माहिती देत, “मत्स्यपालन व्यावसायिकदार यांनी धरणात काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत. त्यात टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जलाशयात शेवाळ वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि परिणामी पाण्याला हिरवा रंग दिसून येतो. तो काही कालावधीत पूर्ववत होतो असे त्यांनी सांगितले.”
घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी जलाशयातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत स्थानिकांनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर त्वरित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाण्यातील तवंग हटवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबवण्याच्या सूचनाही संबंधित विभागास दिल्या आहेत.
धरणाच्या पाण्यातील हा रंग बदल जैविक की रासायनिक प्रक्रिया आहे, याबाबत वैज्ञानिक आणि निष्पक्ष स्पष्टीकरण मिळावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने यावर कार्यवाही करावी, अशी आग्रही भूमिका नागरिकांनी घेतली आहे.