भोर: भोर विधानसभा मतदारसंघामध्ये 564 मतदान केंद्र असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कमीशनींगचे कामकाज सरदार कान्होजी जेथे शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था (ITI) भोर येथे सुरु होते. यावेळी गोपनीयतेचा भंग झाल्या प्रकरणी भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमीशनींगवेळी निवडणूक कर्तव्यार्थ्य अधिकारी / कर्मचारी तसेच मतदान प्रतिनिधी यांना कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास बंदी असताना बेकायदेशीरपणे मोबाईल घेऊन येऊन उमेदवाराच्या प्रतिनिधी म्हणून आलेल्या सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून गोपनीयतेचा भंग केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेदवारांचे प्रतिनिधी विजय हनुमंत राऊत (रा. लवळे, ता. मुळशी) आणि नारायण आनंदराव कोंडे (रा. केळवडे, ता. भोर) यांनी मॉकपोलची शुटिंग केली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे गोपनियतेचा भंग झाला आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. यांनी मॉकपोलचे शुटींग करुन ते सोशल मिडीयावरती प्रसारीत करुन गोपनियतेचा भंग केला. त्यामुळे आरोपींवर भोर पोलीस स्टेशनमध्ये आयटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा गोष्टी करणे कायद्याने गुन्हा
मतदान केंद्र, मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांच्या वापरावर कड़क बंदी घालण्यात आली. अशाप्रकारे व्हिडीओ तयार करणे व ते व्हिडीओ बिबिध व्हॉटस्अॅप ग्रुप, समाज माध्यमावरती प्रसारीत करणे हा गुन्हा आहे. असे करणाऱ्यावर कडक कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती डॉ. विकास खरात, निवडणूक निर्णय अधिकारी 203- भोर विधानसभा मतदारसंघ यांनी दिली. सदर घटनेचे गांर्भीय विचारात घेता जिल्हाधिकारी सुहास दिवसे व जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे भेट देवून याची माहिती घेतली आहे.