भोर – पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी भोर तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला असून भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी तालुक्यातील सर्व पदवीधर मतदारांना मतदार नोंदणीसाठी आवाहन केले आहे .या मतदार नोंदणीची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ असल्याने या तारखेपूर्वी दोन्ही मतदार संघांकरिता पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत आणि लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी असे सांगण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या या निवडणुकांकरिता मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याकरिता ३० सप्टेंबर रोजी कार्यक्रम जाहीर झाला आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२५ आहे. भोर विधानसभा मतदारसंघामध्ये भोर तालुक्यामध्ये एकूण ५ मतदार केंद्रे आहेत. त्यापैकी भोर मतदान केंद्राकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालय भोर, भोलावडे मतदान केंद्राकरिता तहसिल कार्यालय भोर, आंबेघर या मतदान केंद्राकरिता गट विकास अधिकारी, पंचायत समिती भोर, किकवी मतदान केंद्राकरिता मुख्याधिकारी भोर, नगरपरिषद भोर व नसरापूर मतदान केंद्राकरिता गट शिक्षण अधिकारी भोर, पंचायत समिती भोर या ठिकाणी मतदार नोंदणी करणेसाठी मतदार नोंदणी कार्यालय उघडले आहे. मतदार नोंदणीकरिता ५ पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना नं. १८ चा फॉर्म तर शिक्षक मतदार संघाकरिता नमुना नं. १९ चा फॉर्म असणार आहे.
प्रकरणपरत्वे नमुना १८ किंवा १९ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ०६/११/२०२५ (गुरुवार) या पुर्वीची मतदार यादी ग्राह्य धरली जानार नाही तरी नव्याने मतदार नोंदणी करावी भोर तालुक्यात ५ मतदान केंद्रे, वेल्हा तालुक्यात १ मतदान, व मुळशी तालुक्यात ४ मतदान केंद्र आहेत.
द.३० सप्टेंबर २०२५ ते ०६/११/२०२५ या कालावधित (या मधिल शासकीय सुट्यांचे दिवस वगळून) मतदार नोंदणी संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे करावयाची आहे. ५ पदनिर्देशित अधिकारी भोर तालुक्यासाठी, १ वेल्हा तालुक्यासाठी व ४ मुळशी तालुक्यासाठी पदनिर्देशित अधिकारी यांची नेमणुक करणेत आलेली आहे.
यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे
१) तहसीलदार कार्यालयतील फॉर्म नंबर १८ व फॉर्म नं.१९
२)आय डी साईज रंगीत फोटो
३) आधार कार्ड व मतदान कार्ड
४) पदवी (डिग्री) प्रमाणपत्र किंवा समकक्ष पदविका (डिप्लोमा) प्रमाणपत्र अथवा अंतिम वर्षाची गुणपत्रिका
५) नावात बदल असल्यास राजपत्र (गॅझेट) किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅनकार्ड
६) फॉर्म नं. १८ व १९ वरील कागदपत्रासहीत आपल्या तहसिल कार्यालयात जमा करावा.
७)०१-११-२०२२ पर्यंतचे पदवीधर मतदार यामध्ये नोंदणी करू शकतात असे सांगण्यात आले आहे

















