सामाजिक बांधिलकी जपत एक हात मदतीचा पुढे करत एक आदर्श उपक्रम
भोर – पुणे येथे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल, लक्ष फाउंडेशन पुणे, Aalimco मुंबई आणि जिद्द फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत भोर तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील तसेच भोर शहरातील एकूण ६५ गरजू नागरिकांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप आपल्या नवले हॉस्पिटल पुणे येथे सोमवार (दि.३०) करण्यात आले.
दैनंदिन संवाद आणि आयुष्यातील दर्जेदार सहभागासाठी “श्रवण” हा मूलभूत अधिकार आहे. मात्र आर्थिक व भौगोलिक मर्यादांमुळे अनेक नागरिक श्रवणयंत्रांसारख्या मूलभूत वैद्यकीय साधनांपासून वंचित राहतात. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार योग्य श्रवणयंत्राची निवड करून वाटप करण्यात आले. या उपक्रमात ६० वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रक्रिया पार पाडण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटलमधील नाक-कान-घसा विभागामध्ये करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत शिबिर पार पडले. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठीची नावनोंदणी अगोदरच करून घेतल्याने नंतरची व्यवस्था व्यवस्थितपणे करण्यात आली होती.
हा उपक्रम केवळ वैद्यकीय मदत न राहता, गरजूंपर्यंत माणुसकीच्या धाग्याने पोहोचलेली सेवा ठरली आहे. भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात घेऊन समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा निर्धार यावेळी संस्थांनी व्यक्त केला.