पाण्याचे परिक्षण ,टेस्टींग करून लवकरच रिझल्ट मिळणार
भोर तालुक्यातील भाटघर (येसाजी कंक जलाशय) धरणातील पाणी आज सोमवारी (दि.२१) दुपारी अचानक हिरवे दिसू लागल्याने धरण काठावरील न-हे, माळवाडी, संगमनेर, भाटघर, सांगवी परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती धरणातील पाणी दूषित झाले असून आरोग्यास हानिकारक असल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. या घटनेचे वृत्त देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरले. मात्र या घटनेची तात्काळ माहिती मिळताच नीरा पाटबंधारे उपविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांनी याबाबत खुलासा करत सदर पाणी हे शेवाळे वाढण्याच्या प्रक्रियेने हिरवे झाले होते .जलाशयातील पाण्याला काही काळ हिरवा रंग आला होता तो काही कालावधीतच पूर्ववत झाला आहे. धरणात मत्स्यपालन व्यवसायिकदारांनी काही ठिकाणी मत्स्यपालनासाठी पिंजरे लावले आहेत. त्यात माशांना वाढीसाठी खाद्य टाकले जातात अशा पाण्यात टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते .त्यामुळे जलाशयाच्या पाण्यात शेवाळ वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते .त्यामुळे जलाशय काही काळ गडद हिरवा होऊन पाण्यार हिरवा तवंग येतो परंतु सदरचा रंग हा कालांतराने पूर्ववत होतो. सदरचे वृत्त सर्वत्र पसरताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करत सदरचे हिरवे पाणी म्हणजे शेवाळे असुन काही काळ हिरवे असणारे पाणी कालांतराने पुन्हा पुर्ववत झाले आहे . नागरिकांनी घाबरून नये असे आवाहन पाटबंधारे विभागाकडुन करण्यात आले आहे. भंडलकर यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग यांच्याशी चर्चा केली असून याबाबत संबंधित विभागास कळविले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही दक्षता म्हणून पाण्याची तपासणी करण्यात येणार असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.परंतु अजूनही भाटघर धरणातील मत्स्यपालनातील माशांचे पिंजरे कधी हटणार आणि धरण पुन्हा पुर्वीप्रमाणे कधी दिसणार ? याकडे मात्र नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
