भोर (ता. २८) : पर्यावरण संरक्षणाबाबत सतत बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र निष्काळजीपणाचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. आज पुन्हा एकदा भोर येथील बुवा साहेब वाडी परिसरात आंब्याचे मोठे झाड बेकायदेशीरपणे तोडण्यात आले. या झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी होती. झाड तोडल्याने बगळ्यांसह त्यांच्या छोट्या पिल्लांचा मृत्यू झाला असून परिसरात दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी, प्राणीमित्र तरबेज खान यांनी प्रशासनाविरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, “गेल्या काही दिवसांत भोरमध्ये परवानगीशिवाय झाडे तोडण्याच्या तक्रारी सतत येत आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार लेखी आणि मौखिक तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. उलट बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांचे मनोबल वाढवले जात आहे.”
पर्यावरण प्रेमींच्या मते, एका झाडावर केवळ पक्ष्यांची घरटीच नसतात तर त्यावर संपूर्ण पर्यावरणीय संतुलन अवलंबून असते. पक्ष्यांचे मृत्यू हा फक्त सुरुवात आहे. झाडांची मोठ्या प्रमाणावर होणारी कत्तल म्हणजे भविष्यात भोर परिसराच्या हरित पट्ट्याला धोका निर्माण होण्याची घंटा आहे.
या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या वृक्षतोड करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी आणि निष्क्रिय राहिलेल्या अधिकाऱ्यांवरही विभागीय पातळीवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लवकरच भोरमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पर्यावरण प्रेमी व प्राणीमित्रांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन वनविभाग प्रशासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे. वृक्षतोडीचे असे प्रकार थांबवले नाहीत तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.