पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उजनीसह वीर धरणात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे उजनीसह वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. भीमा नदीसह नीरा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खडकवासला धरणातून आज मुठा नदी पात्रात 8 हजार 734 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये, त्याचबरोबर खबरदारी घ्यावी, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. खडकवासला पाठोपाठ पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पवना धरण सद्यस्थितीत 99% भरलेले असून पाणलोट क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे 1400 क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून, पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार सांडव्याद्वारे विसर्ग सोडण्यात येणार आहे.