बारामतीः बारामतीची ओळख म्हणजे शरद पवार. राज्याच्या राजकारणात अनेक दशकांचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेलं मोठं नाव म्हणजे शरद पवार. बारामतीमधील काटेवाडी या छोट्याशा गावापासून ते पुढे महाराष्ट्र आणि देशात आपल्या राजकारणाची छाप सोडणारा मुरब्बी नेता म्हणजे शरद पवार. देशातील राजकारणात काही नेत्यांची नावे घेतली जातात, त्यापैकी एक म्हणजे शरद पवार. बारामतीमधील गोविंद बागेत पवार कुटुंब मोठ्या थाटात दरवर्षी दिवाळी पाडवा हा सण मोठ्या उत्सहात साजरे करते. मात्र यंदाची वर्षी दोन पवारांचे दोन दिवाळी पाडवा हा सण साजरा झाला आहे. यामुळे राजकारण नात्यांपेक्षाही महत्वाचे झाले आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बारामतीमध्ये दोन वेगळे दिवाळी पाडवा सण साजरे करण्यात आले. एक झाला तो गोविंद बाग (शरद पवार) आणि दुसरा काटेवाटी (अजित पवार) या ठिकाणी. दोन्ही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रीघ पाहिला मिळाली. दोन्हीकडच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांची भेट घेत त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी पाडवा म्हटलं की बारामतीमध्ये एक वेगळाच माहोल असतो. कारण असते ते पवारांना भेटून शुभेच्छा देण्याचे. काहींना तर असाही प्रश्न पडला होता नेमकं कोणत्या पवारांना शुभेच्छा द्यायच्या. काहींनी जे की कोणत्याही पक्षांसोबत नाही, अशांनी दोन्ही पवारांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
शरद पवार यांच्या सोबत स्टेजवर खा. सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि सुळे यांच्या स्नुषा रेवती सुळे या उपस्थित होत्या. तर दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या स्टेजवर उपस्थित होते. बारामतीमध्ये पवारांचा दिवाळी पाडवा हा गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. मात्र, दोन्हीकडे वेगळे पाडवे साजरे झाल्याने या परंपरेमध्ये वितुष्ट आले असल्याचे पाहिला मिळत आहे. ४ तारेखनंतर राज्यातील उमेदवारांबाबतची परिस्थिती लक्षात येईल. राज्यातील बहुंताशी भागात राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहिला मिळणार आहे. यामुळे साहेब की दादा यापैकी मतदार राजा कुणाला कौल देतो हे पाहणे औचिक्याचे असणार आहे. तुर्तास तरी दोन पवारांचे दोन पाडवे बारामतीमध्ये साजरे झाले आहेत.