बारामतीः येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर दिव्यांग बांधवाच्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. या आंदोलनामध्ये पुणे जिल्ह्यासह बारामती, इंदापूर तालुका आणि परिसरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आंदोलन प्रहार संघटनेच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनात दिव्यांगांना महिन्याला ६ हजार रुपये पेन्शन, भूमीहीन बेघर दिव्यांगांना १ गुठा जागा, दिव्यांगाना राजकीय आरक्षण, दिव्यांगांची पदभरती करावी, औद्यिगीक क्षेत्रांमध्ये ४ टक्के आरक्षण, आदी मागणी घेऊन शांततेच्या मार्गाने उपोषण बारामती येथील भिगवण रस्त्यालगत असणाऱ्या सहयोग सोसायटीसमोर हे आंदोलन करण्यात आले.
पोलिसांसोबत आंदोलन कर्त्यांची शाब्दिक चकमक
यावेळी आंदोलनकर्ते आणि दिव्यांग बांधवांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सदर आंदोलन या ठिकाणी करता येणार नाही असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. यामुळे आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक घडली.