मुळशी : भोर मतदारसंघाच्या विकासात मागे राहिलेला प्रदेश पुनरुज्जीवित करण्यासाठी, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि मोठ्या प्रकल्पांचा विकास करण्याच्या उद्देशाने अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी मतदारांना एक संधी देण्याचे आवाहन केले आहे. “भोर मतदारसंघाचा कायापालट करून प्रगतीचा सुवर्णकाळ आणल्याशिवाय राहणार नाही,” असे आश्वासन कोंडे यांनी दिले.
बुधवारी (दि. १३) मुळशी तालुक्यात कोंडे यांनी प्रचार दौऱ्याचे आयोजन केले. रॅलीद्वारे मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. महायुतीने उमेदवारी नाकारल्यामुळे कोंडे यांनी रिक्षा चिन्हावर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रचारादरम्यान मुळशीतील विविध गावांतील नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
या प्रचार दौऱ्यात त्यांनी भूगाव, भुकूम, पिरंगुट, घोटावडे, भरे, मुलखेड, चांद, माण, हिंजवडी, मारुंजी, नेरे, कासारसाई, महाळुंगे, सूस, नदि, लवळे फाटा अशा अनेक गावांमध्ये भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्यात मुळशीतील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे पदाधिकारी आणि कोंडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोंडे यांनी मतदारांना उद्देशून सांगितले, “मुळशीकरांचे नेहमीच माझ्यावर प्रेम आहे, त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. गेल्या १५ वर्षांत भोर मतदारसंघात कोणताही ठोस विकास झालेला नाही, तरुणांना रोजगाराच्या संधी नाहीत, आणि पर्यटनाचा विकासही होत नाही. शेतकऱ्यांच्या मुलाला विधानसभेत पाठवा, आणि मी मतदारसंघाच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न करीन,” असे आवाहन कोंडे यांनी केले.कोंडे यांच्या या प्रचार दौऱ्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, मतदारसंघाच्या विकासाबद्दल नवीन आशा निर्माण झाली आहे.