कापूरव्होळ:वीर धाराऊ माता तरुण मंडळाच्या वतीने आयोजित शस्त्रास्त्र शिबिराचा समारोप आज उत्साहात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या शिबिरात लहान मावळ्यांना पारंपरिक शस्त्रविद्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. सुप्रसिद्ध धारकरी ओमकार मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाले.
समारोपप्रसंगी लहान मावळ्यांनी पावसाची तमा न बाळगता तलवारबाजी, दांडपट्टा, भाला आदी शस्त्रांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांचे आत्मविश्वासपूर्ण आणि सुसंघटित सादरीकरण पाहून ग्रामस्थ, महिला मंडळ आणि पाहुणे मंत्रमुग्ध झाले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या प्रदर्शनाला भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमात धारकरी ओमकार मांढरे यांचा सन्मान वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच पंकज बाबी गाडे पाटील, उद्योजक दीपक लेकावळे, माऊली बदक, शिवप्रसाद उकिरडे, योगेश कोंढाळकर, शरद मस्के, देवेंद्र शिळीमकर, सागर गाडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला मंडळाच्या सरिता गाडे पाटील, मनिषा गाडे पाटील, प्रज्ञा मस्के पाटील, उर्मिला लेकावळे यांच्यासह अनेक महिलांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी पाहुण्यांचा सत्कार करत शिबिरातील योगदानाबद्दल आभार मानले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल वीर धाराऊ माता तरुण मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमातून ग्रामीण भागातील बालकांमध्ये शिस्त, परंपरा आणि शौर्याचे बीज रोवले गेले असून, गावाच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी हे मोलाचे पाऊल ठरले आहे.