भोर/पुरंदरः २० नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. लोकसभेच्या तुलनेने विधानसभेला चांगले मतदान केले असल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या सरासरी आकडेवारीवरून दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील आणि पर्यायाने पुणे शहराला लागूनच असलेल्या भोर विधानसभा आणि पुरंदर विधानसभा या दोन मतदार संघात निवडणुकीच्या दिवशी मतदारांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण पाहिले मिळाले. दोन्ही विधानसभा मतदार संघात काही ठिकाणचे अपवाद वगळता सर्वत्र उत्साही पद्धतीने मतदान झाले. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात ७२.९४ टक्के सर्वांत जास्त मतदान झाले तर सर्वांत कमी म्हणजेच अवघे ५०.७३ टक्के मतदान हे मुंबई शहरात झाले असल्याची आकडेवारी सांगते. यावरून ग्रामीण भागातील नागरिकांत मतदानाचा उत्साह होता तर शहरी भागात निरउत्साह पाहिला मिळाला.
भोर आणि पुरंदर या दोन्ही मतदार संघात ग्रामीण आणि शहरी मतदारांचा भरणा आहे. भोर विधानसभेत पाहिले तर भोर शहर ग्रामीण, वेल्हे दुर्गभ भाग आणि मुळशी शहरी आणि ग्रामीण अशी सरमिसळ आहे. दुसरीकडे पुरंदर विधानसभा मतदार संघात हीच परिस्थिती आहे. पुरंदर विधानसभेत दोन भाग पडतात एक घाटाच्यावर आणि घाटाच्या खाली म्हणजेच दिवे घाट ही लक्ष्मणरेषा. त्याच्या खाली शहरी आणि ग्रामीण असा भरणा आहे, तर घाटच्या वरच्या बाजूस ग्रामीण आणि निमशहरी भाग आहे. यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही मतदार संघात ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाबद्दल उत्साह पाहिला मिळतो. भोरमध्ये चौरंगी तर पुरंदरमध्ये तिरंगी लढत झाली.
भोरमध्ये वाढ, पुरंदरमध्ये घट
पुणे जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ५७.२५ टक्के नोंदवली गेली आहे. भोरमध्ये मतटक्का वाढल्याचे पाहिला मिळत आहे. या मतदार संघात सरासरी ६८ टक्के मतदान झाले आहे. मागच्या पंचवार्षिकच्या तुलनेत काही अंशी या वेळेस मतदानात किंचित वाढ झाली असल्याची दिसते. तर पुरंदरमध्ये मतटक्का काही अंशी घसरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या मतदार संघात सरासरी ६१ टक्के एवढे मतदान झाले आहे. मागच्या पंचवार्षिकच्या तुलनेत सर्वसाधारणपणे ४ टक्क्यांची घट झाली असल्याचे दिसून येते.