सासवड (बापू मुळीक ) : जेजुरी येथील विस्तारित एमआयडीसी प्रकल्पातून मावडी कडेपठार गावची २४०० एकर जमीन अखेर वगळण्यात आली आहे. ही जमीन संपादनातून काढण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने आज राजपत्र प्रसिद्ध केले. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे शेतकऱ्यांसह बैठक घेऊन यासाठी केलेला पाठपुराव्याला यानिमित्ताने यश आले. मुंबईत ठाण मांडून शिवतारे यांनी मावडीकरांना दिलेला शब्द खरा करून दाखवला.
नुसता शब्द दिला नाही तर तो खराही करून दाखवला
याबाबत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अनेकांनी मावडी ग्रामस्थांना शिक्के काढण्याचा शब्द दिला. पण केवळ मतांसाठी अशी आश्वासने देऊन या लोकांची केवळ फसवणूक केली. विद्यमान आमदारांनीही शेतकऱ्यांना वारेमाप आश्वासने देऊन मते लाटली. पण मी नुसता शब्द दिला नाही तर तो खराही करून दाखवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मी अत्यंत आभारी आहे. पालकमंत्री अजितदादा पवार यांनीही याकामी सहकार्य केले. मी दिलेले शब्द कसोशीने पाळतो. गुंजवणीचा शब्द मी दिला आणि जीवाशी खेळून पाळला. फुरसुंगी उरुळीला पिण्याच्या पाण्यासाठी शब्द दिला तोही पाळला. हवेलीत टॅक्सचा शब्द दिला तोही खरा केला. आज हा चौथा विषय मार्गी लावला याचे मला समाधान आहे. विद्यमान आमदार आणि खासदार महाविकास आघाडी सत्तेत असताना हे विषय मार्गी लावू शकले असते पण त्यांचा नाकर्तेपणा पुरंदरला अनेक वर्ष मागे घेऊन गेला आहे असा घणाघातही शिवतारे यांनी केला.
हत्तीवरून मिरवणूक काढणार – अमोल चाचर
माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यामुळे आज आमच्या गावात दिवाळी साजरी झाली. हे काम केल्यास हत्तीवरून मिरवणूक काढणार असा शब्द आम्हीही शिवतारे यांना दिला होता. तो आम्ही पूर्ण करणार असे यावेळी माजी सरपंच अमोल चाचर यांनी सांगितले.