भोर (ता. भोर): गेल्या वर्षभरापासून नांदगाव येथील दोन खडी क्रेशरच्या सुरुंग स्फोटांमुळे ग्रामस्थांच्या घरांना तडे गेल्याने स्थानिक प्रशासनाने क्रेशर बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आठ दिवसांपूर्वी क्रेशर पुन्हा सुरू झाल्याने नांदगाव ग्रामपंचायतीने आंदोलनाचा पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दोन्ही खडी क्रेशर तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्यामुळे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
नांदगावच्या हद्दीत गेल्या १४ वर्षांपासून मॅक्सवेल रॉक प्रोसेसिंग एलएलपी व ज्योती स्टोन क्रेशर या कंपन्यांचे खडी क्रेशर कार्यरत होते. सुरुंग स्फोटांमुळे ग्रामस्थ विष्णू कुडले यांचे घर पूर्णतः पडले, तर इतर अनेक घरांना तडे गेले. त्यामुळे पूर्वीचे तहसीलदार सचिन पाटील यांनी हे खडी क्रेशर बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, क्रेशर पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला.
मंगळवारी (ता. १४) ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक तहसील कार्यालयात आंदोलनासाठी पोहोचले. यावेळी क्रेशर सुरू राहावी अशी मागणी करणारे काही शेतकरी व बंदची मागणी करणारे ग्रामस्थ यांच्यात वादावादी झाली. रोजगारासाठी क्रेशर सुरू ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळत असल्याचे सांगितले, तर इतरांनी घरांची हानी थांबवण्यासाठी क्रेशर बंद करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
तहसीलदार राजेंद्र नजन यांनी संबंधितांना गौणखनिज खोदकाम मंजुरीचे नूतनीकरण करून आणण्याचे आदेश दिले. मंजुरी येईपर्यंत कोणतेही काम होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तूर्तास क्रेशर बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने ग्रामपंचायतीने आंदोलन स्थगित केल्याचे महिला सरपंचांनी जाहीर केले.
नांदगावमधील परिस्थिती नियंत्रणात असून पुढील आदेश मिळेपर्यंत गावातील खडी क्रेशर बंद राहतील. प्रशासनाने स्थानिकांचा रोष लक्षात घेऊन परिस्थिती हाताळली असल्याचे दिसून येते.