भोर (पुणे) प्रतिनिधी :भोर-महाड मार्गावरील वरंध घाट रस्त्यावर वेणुपुरी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री सिमेंट मिक्सर ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीत पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटमार्गावर सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी सिमेंट घेऊन जाणारा ट्रक रात्रीच्या सुमारास घाटमार्गाने जात असताना वळणावर चालकाचा तोल सुटला आणि ट्रक मोरीत कोसळला.
अपघातानंतर तात्काळ स्थानिक ग्रामस्थ आणि कामगारांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत क्रेन आणि जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात आला. या दरम्यान घाटातील रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
दरम्यान, घाटातील रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने अशा घटना घडत असल्याची तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने खबरदारी घेत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.


















