खंडाळा (ता. २०) : खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरामध्ये सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्या सहा जणांच्या टोळीविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांना सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार झालेल्यांमध्ये टोळीप्रमुख प्रकाश अशोक जाधव, त्याचे सहकारी मयूर अशोक जाधव, विशाल महादेव जाधव, सोन्या उर्फ विकास संजय पवार (सर्व रा. शिरवळ, ता. खंडाळा), किरपालसिंग शीतलसिंग दुधानी (रा. लोणावळा, ता. मावळ) व सचिन उर्फ बाळा तुकाराम जाधव (रा. वीर, ता. पुरंदर) यांचा समावेश आहे.
या टोळीवर दरोडा, जबरी चोरी, दंगा, मारामारी, महिलांचा विनयभंग, तसेच जाणीवपूर्वक दुखापत पोचवणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. वारंवार अटक व प्रतिबंधात्मक कारवाई करूनही ही टोळी थांबण्याऐवजी अधिकच बळावली होती. स्थानिक नागरिकांचा त्रास वाढत असल्याने कडक कारवाईची मागणी होत होती.
याबाबतचा प्रस्ताव शिरवळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्याची चौकशी फलटणचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी बी. वाय. भालचिम यांनी केली. सुनावणीदरम्यान सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या टोळीला दोन वर्षांसाठी पुणे व सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला.
पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीच्या कारवायांमुळे खंडाळा परिसरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती. यामुळे कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात पुढील काळातही अशा गुन्हेगारांवर हद्दपारी, मोक्का, एम.पी.डी.ए.सारख्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.