फलटण (जि. सातारा): छत्रपती ॲग्रो टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या दोन भागीदारांनी फलटणमधील व्यापाऱ्याची तब्बल ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खटला चार वर्षांच्या लढाईनंतर न्यायालयात निष्पन्न झाला असून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती के.आर. पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी संतोष बाठे आणि आशा संतोष बाठे यांना एक वर्षे कारावास व ८५ लाख ८० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात फिर्यादी संतोष सदाशिव गायकवाड, (संतोष ट्रेडर्स, फलटण) यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांनी मका व सोयाबीन यासारख्या धान्याचा पुरवठा छत्रपती ॲग्रो टेक कंपनीला २०१८ पासून सातत्याने केला होता. यावेळी एकूण व्यवहाराची रक्कम २ कोटी ४० लाख २८ हजार ७५५ रुपये झाली होती. यातील काही व्यवहारांचे पैसे आरोपींनी दिले असले तरी ७९ लाख ५४ हजार ५१९ रुपये थकीत राहिले होते.
पैसे वसूल करण्यासाठी फिर्यादीने वारंवार मागणी केली असता आरोपी संतोष बाठे यांनी आयसीआयसीआय बँकेच्या सातारा शाखेतील खात्याचा ७८ लाख रुपयांचा चेक (दि. १० जुलै २०२०) दिला. मात्र, तो चेक “Funds Insufficient” या कारणास्तव बाउन्स झाला. यानंतर कायदेशीर नोटीस पाठवूनही पैसे परत न दिल्यामुळे फिर्यादीने न्यायालयात खटला दाखल केला.
न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांतून आरोपींची फसवणुकीची भूमिका स्पष्ट झाली. न्यायालयाने १. आरोपींनी कायदेशीर देणे असल्याचे सिद्ध झाले, २. धनादेश निधीअभावी वटला नाही, ३. नोटीस पाठवूनही १५ दिवसांत पैसे परत दिले गेले नाहीत, ४. चेक वटण्याच्या खात्रीवर दिला होता, अशा सगळ्या बाबी तपासून आरोपी दोषी असल्याचे ठरवले.
न्यायालयाने कलम १३८ नुसार दोषी ठरवून दोघांना प्रत्येकी १ वर्ष कारावास, तसेच एकूण दंड ८५ लाख ८० हजार रुपये अशी शिक्षा ठोठावली आहे. ही दंडरक्कम फिर्यादीस भरपाई म्हणून देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.