भोर (पुणे): भोर पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबर 2024 रोजी आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिल जगन्नाथ पाटील (वय 52, कृषी पर्यवेक्षक, रा. भोर, ता. भोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल दशरथ जाधव (रा. होळकर वाडी, ता. हवेली) आणि कृष्णा महादेव कांबळे (रा. बालाजी पार्क, केसनंद, ता. हवेली) यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता प्रचारासाठी वाहनांवर एल.ई.डी स्क्रीन लावले होते.
या वाहनांवर किरण दत्तात्रय दगडे (अपक्ष उमेदवार, भोर विधानसभा मतदार संघ) यांचे प्रचार संदेश दाखवण्यात आले होते. आदर्श आचारसंहिता 16 ऑक्टोबरपासून लागू झालेली असून, प्रचारासाठी परवानगी घेणे आवश्यक होते. आरोपींनी निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्या नुसार कारवाई करण्यात आली आहे.तपास अधिकारी एस.जे. खोत या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
 
								 
                                
 
                                 
                                 
                                 
		





 
							










