भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी असताना अद्यापही भोर विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याने राजकीय चर्चांना उधान प्राप्त झाले आहे. आघाडीच्या वतीने विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांची उमेदवारी काँग्रेसकडून निश्चित करण्यात आली. मात्र, युतीचा उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांना उमेवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे आता युतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जागेसंदर्भात घमासान सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच युतीमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची चर्चा देखील करण्यात येत आहे. अशातच भोर विधानसभेसाठी युतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्तता वर्तवण्यात आली आहे. युतीकडून कोणचेही नाव जाहीर न झाल्याने युतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. यामध्ये भोर विधानसभेचे भाजपचे निवडणूक समन्वयक प्रमुख किरण दगडे यांनी अपक्ष, भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जीवण कोंडे यांनी भाजपकडून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता युतीचा उमेदवार नक्की कोण, असा प्रश्न निर्माण झाला असून, युतीमध्ये बंडखोरीची शक्यता येथील राजकीय जाणकरांनी वर्तवलेली आहे.