नसरापूरः काल सायंकाळच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्यावर राजगड पोलिसांनी इनोव्हा कंपनीच्या कारमधून ५ कोटी रुपये हस्तगत करून संबंधित कार ताब्यात घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रक्कम कारमध्ये आढळून आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी या कारमध्ये चारजण असल्याची माहिती दिली. यानंतर इनोव्हा कंपनीची क्रिस्टा या कारमधील सागर सुभाष पाटील (वय ३७), रफिक अहमद नजीर अहमद नदाफ (वय५०), बाळासो आणासो आसबे (वय ५१), शशिकांत तुकाराम कोळी (वय ३४) (सर्व रा. सांगोला (जिल्हा सोलापूर ) अशी गाडीत आढळल्यांची नावे आहेत. या प्रकरणाला १६ तास उलटून देखील अद्यापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याने चर्चांण उधाण आला आहे. यामुळे राजगड पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे.
या प्रकरणात एमएच ४५ AS २५२६ नंबरची कार राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इनोवा क्रिस्टा ही टोयोटा कंपनीची गाडी ताब्यात घेतली आहे. मात्र, गुन्हा दाखल न करता केवळ स्टेशन डायरीला रक्कम पकडल्याबाबतची नोंद पोलिसांनी केली आहे. नेमकी रक्कम किती होती, ती रक्कम कोणाला देणार होते. याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच राजगड पोलिसांकडून कोणतीच माहिती न देता पकडलेल्या व्यक्तींना कोठे ठेवण्यात आले आहे, ही बाब गुलदस्त्यातच आहे.
संजय राऊतांचा गंभीर आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा उल्लेख करत या रोख रक्कमेवरुन गंभीर आरोप केला आहे. पुण्यातील खेड-शिवापूर टोलानाक्यावर काल दोन गाड्या होत्या. त्यामध्ये एकूण 15 कोटी होते. मी 8 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंच्या आमदारांना आणि इतर काही लोकांना 50 कोटींपेक्षा अधिक रक्कम पोहचवण्याची तयारी झाली आहे. 15-15 कोटींची पहिली इन्स्टॉलमेंट पाठवली जात आहे. आचारसंहिता लागली त्या रात्रीच ही तयारी झाली. मोठी रक्कम अनेक ठिकाणी पोहचवण्यात आली. सांगोल्यातील गद्दार आमदाराचे 15 कोटी जात होते. त्याच आमदाराचे लोक गाडीमध्ये होते. एक फोन आला त्या गाड्या सोडल्या,” असं संजय राऊत म्हणाले. “एक इन्पेक्टर त्या आमदाराने त्याच्या गावात सेवेसाठी ठेवला होता. तो तिथे पोहचला आणि त्याने एक गाडी सोडवली. पण आमच्या लोकांनी एका गाडी पकडून दिली. राज्यात 150 आमदार आहेत ज्यांना 15 कोटी पोहचले आहेत. हे एक उदाहरण आहे की मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडून कशाप्राकारे पैशांचं वाटप केलं जात आहे,” असं राऊत म्हणाले. राऊत यांनी 150 आमदारांना प्रत्येकी 15 कोटी म्हणजेच 225 कोटींचं वाटप करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर करीत केला आरोप
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून, काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला असल्याचे ते म्हणाले. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असे त्यांनी सांगितले.
शहाजी बापू पाटलांकडून आरोपांचे खंडण
या प्रकरणी संजय राऊतांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडण शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. राज्यातील ठाकरे सरकार कोसळ्यापासून संजय राऊतांना शहाजी बापू पाटीलच दिसत आहेत. पण खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापडलेल्या पैशांशी किंवा त्या कार्यकर्त्यांशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे. सांगोला मतदारंसघात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याने माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रकरणात राजकीय शक्तींचा वरदहस्त ?
या प्रकरणाची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि राजगड पोलिसांसह तहसिलदार, प्रांत अधिकारी, आयकर विभाग आदी विभागातील अधिकारी वर्ग घटनास्थळी दाखल झाले. निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राजगड पोलीस स्टेशनमध्ये रक्कम जप्तीची कारवाई पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. तसेच ताब्यात घेण्यात आलेली इनोव्हा कंपनीची कार अमोल शहाजीराव नलावडे यांच्या मालकीची असून, ही गाडी एका बांधकाम व्यावसायिकाकडे असते. गाडी पकडण्यात आली त्यावेळी गाडीमध्ये 4 जण होते. ते सर्वजण एका आमदाराचे निकटवर्तीय असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून या प्रकरणात कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. यामुळे या प्रकरणात मोठ्या राजकीय शक्तींचा तर हात नाही ना असा प्रश्न उपस्थि केला जात आहे.
…..मग कार नक्की कोणाची?
या प्रकरणात अमोल नलावेड यांच्या नावावर ही कार असून, त्यांची प्रतिक्रिया समोर आली असून, ही कार त्यांनी बाळासाहेब आसबे नामक व्यक्तीला जून महिन्यात विकली असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणाशी माझा कोणत्याही संबंध नसून, मी ही कार जूनमध्ये बाळासाहेब आसबे यांना विकलेली आहे. त्यामुळे माझा त्या पैशांची काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप वाहन कागदपत्रांचे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आपले नाव समोर आले असल्याचे न तरी ही घटना आणि रोख रकमेशी आपला संबंध नसल्याचा नलवडे यांनी सांगितलं आहे.