शिरुर: शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती शिकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली होती. त्याबाबत खातरजमा करुन पोलीस पथकाने तीन जणांना या प्रकरणी अटक करुन त्यांच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार रोहीदास दौलत पारखे यांनी फिर्याद दाखल केली असून ओंकार कृष्णराज आदक (वय १९) रा. होमाचीवाडी, टाकळी भिमा, ता. शिरुर, जि. पुणे, चेतन सुनिल शिंदे (वय २१) रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर, जि. पुणे, शरद देवीदास माने (वय २१) रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर या तिघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहीती शिकापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याबाबत त्यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.
आरोपीच्या घराच्या जवळून घेतले ताब्यात
त्याप्रमाणे शिकापुर पोलीस स्टेशच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे तसेच पोलीस अंमलदार सहायक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर यांनी मिळालेल्या माहितीनुसार निमगाव म्हाळुंगी येथे छापा टाकून ओंकार कृष्णराज आदक (वय १९), चेतन सुनिल शिंदे (वय २१), शरद देवीदास माने (वय २१) या तिघांना चेतन शिंदे याच्या घराच्या जवळ ताब्यात घेतले.
कारवाईत १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त
या तिघांकडे २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुस असा १ लाख १ हजार किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून सदर हत्यार हे त्यांनी मध्यप्रदेश येथून विकत आणले असल्याचे सांगितले आहे. वरील तिन्ही आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, पुणे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापुरचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह सहायक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, प्रतिक जगताप यांच्या पथकाने केली आहे.