राजगडः गुंजवणी नदीच्या पुलाजवळील नदीपत्रात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळावरुन बनाव करुन मयत व्यक्तीचा अपघाताचा डाव आखण्यात आला असून, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना केला होता. पोलिसांना सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. अखेर या प्रकरणी राजगड पोलिसांनी वेगवान गतीने तपास करुन एकाला खेड शिवापूरमधून ताब्यात घेतले होते. आरोपी स्वप्नील खुटवड याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, मयत गणपत गेनबा खुटवड यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या वतीने कारवाई करण्यात आली.
आरोपीला खेड शिवापूरमधून घेतले ताब्यात
या प्रकरणात मयताच्या डोक्याला जखम झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता परिस्थितीप्रमाणे घटना संशयित असून सदरचा प्रकार हा खूनाचा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती. या प्रकरणातील आरोपी स्वप्निल खुटवड याच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिक बळावला. गुप्त बातमीदाराच्यामार्फत पोलिसांना स्वप्नील खेड शिवापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी स्वप्नील खुटवड याला खेड शिवापूर परिसरातून ताब्यात घेतले. सुरूवातीला स्वप्निल खुटवड हा समाधानकारक उत्तरे देत नव्हता, परंतु त्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत व राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांनी विश्वासात घेवून विचारपूस केली. त्यावेळी त्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.
यावेळी मयत गणपत खुटवड यांचे रेशनिंग दुकान आहे. तसेच तो काळुबाई देवीचा देवऋषी असून, तो करणी करतो व त्याने स्वप्निल खुटवड याला करणी केली आहे. त्यामुळे स्वप्निल खुटवड यांना रेशनिंग मिळण्याचे बंद झाले. व त्यांची आर्थिक प्रगती होत नाही, असा गैरसमज झाल्याने स्वप्निल खुटवड याच्या मनात गणपत खुटवड यांच्याविषयी प्रचंड राग होता. या रागातूच त्याने त्यांच्या डोक्यावर दगडाने आघात करून त्यांचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे प्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, एस.डी.पी.ओ. तानाजी बरडे, भोर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षत दत्ताजी मोहिते, कुलदीप संकपाळ, अभिजीत सावंत, अंमलदार अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, राजु मोमीण, अतुल डेरे, बाळासाहेब खडके, राजगड पोलीस स्टेशनचे अजित पाटील, अंमलदार जगदीश शिरसाठ, नाना मदने, अक्षय नलावडे यांनी केली असून, पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.