सिंधूदुर्गः महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसताना मालवण शहरातील एसटी स्थानकात पहिल्या पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ३५ वर्षीय प्रीती केळूसकर यांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी फरार झालेला आरोपी सुशांत गोवेकर याला ताब्यात घेतले आहे.
सदर घटना ही २५ सप्टेंबर रोजी मालवण एसटी स्थानकात घडली. या घटनेत मयत पावलेल्या प्रीती केळूसकर या एका लॅबमध्ये काम करीत असताना पतीने भर बाजारात येऊन त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला आणि यात या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे मालवणात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीला पेट्रोल ओतून जाळून मारल्याप्रकरणी संशयीत आरोपी सुशांत सहदेव गोवेकर (वय ४०, रा. धुरीवाडा, मालवण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले
पहिल्या पतीला दुसरे लग्न केल्याचा राग झाला अनावर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवणमधील धुरीवाडा या मालवण एसटीस्थानकाच्या बाजूला असणाऱ्या लॅबमध्ये प्रीती केळूसकर या नोकरी करीत होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी पहिल्या पतीच्या जाचाला कंटाळून दुसरे लग्न केले होते. मात्र, पहिल्या पतीला ही गोष्ट कळाल्यानंतर त्याला राग अनावर झाला आणि त्याने थेट प्रीती काम करीत असलेली लॅब गाठली. आरोपीने हातामध्ये आणलेल्या बाटलीमधील पेट्रोल प्रीती यांच्यावर ओतून लायटरने त्यांना पेटविण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपी तिथून फरार झाला.