भोरः राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने विविध पक्षातील इच्छुक उमेदवारी पक्षाने आपल्या नावाचा विचार करावा यासाठी मोर्चेबांधणी करु लागले आहेत. भोर विधानसभा क्षेत्राची निवडणूक देखील अनेक इच्छुक उमेदवारांसाठी प्रतिष्ठेचे बनलेली असताना येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, पक्षात दोन गट पडले तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे यातील एक गट महाविकास आघाडी सोबतच जाणार असल्याचा विचार करीत आहे, तर दुसरा गट स्वबळाचा नारा देत विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी राजगड न्यूजला दिली आहे.
हा संपुर्ण वाद पदावरुन झाला असल्याची माहिती मिळत आहे. या दोन गटांपैकी एक गट येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीसोबत राहणार असून, या निवडणुकीची स्वप्ने पाहू लागला आहे. दुसरा गट विधानसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्या दृष्टीने स्वबळावर निवडणुकीची तयार करताना दिसत आहे. यामुळे आता पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांना अधिकृत/अनधिकृत ठरविण्यात मशगूल झाले आहेत. यामुळे येथील सामान्य शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून, कोणाची साथ द्यायची असा प्रश्न त्यांना पडला आहे. तसेच काही दिवासांपूर्वी घेण्यात आलेली बैठक त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना घेण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला असल्याची खात्रीलायक माहिती राजगड न्यूजला सूत्रांनी दिली आहे.
नक्की तालुक्याचा तालुका प्रमुख कोण?
भोर तालुक्यात काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. याबाबतची बातमी एका वृत्तपत्राने प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी त्यामध्ये पहले पदे असणाऱ्या व्यक्तींना पक्षाने बढती दिली आहे.परंतु यातील एक गट म्हणत आहे की, ते पदावरती नाहीत. तर दुसऱ्या गटातील पदाधिकारी म्हणताहेत की, हेच आमचे तालुका प्रमुख मग आता दोन्हीकडून करण्यात आलेल्या दाव्यात नक्की तालुका प्रमुख कोण? हा मोठा संभ्रम निर्माण झाला असून याबाबत खुलासा होणे अत्यंत गरजेचे आहे.
भोर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीबरोबर असलेल्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. एक गट महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा विचार करीत आहे, तर दुसऱ्या गटाने भोर विधानसभेवर दावा करण्याचा विचार करत विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच अनुषंगाने भगवा सप्ताह निमित्ताने बैठक पार पडली. या बैठकीत निर्णय झाला असल्याचे माहिती मिळत आहे. यामुळे अगामी निवडणुकीत पदावरुन उफाळून आलेल्या अंतरगत कलहामुळे त्याचा निवडणुकीत कोणाला फटका बसतो ते पाहणे महत्वाचे असणार आहे.