जेजुरीः शहरातील गणेश उत्सव मंडळांनी आपले देखावे हे रस्त्याचा अंदाज घेऊन तयार करावेत, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गणेश मंडळांच्या मिरवणूका जातात. या चौकातून पुढे गेल्यावर उभ्या पेठेला सुरूवात होते. येथील रस्ता लहान असल्याने अनेक मंडळांच्या मिरवणूका येथे अडतात. परिणामी त्यांच्या मागून येणाऱ्या मिरवणूकांना थांबावे लागते. यामुळे शिवाजी चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मंडळांनी आपले देखावे रस्त्याचा अंदाज घेऊन तयार करुन मिरवणूक काढावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणूकी दरम्यान आपल्या मंडळाचे देखावे रस्त्याचा अंदाज घेऊन तयार करण्यात यावेत. देखाव्यामुळे अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी अगर इतर लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अवाढव्य मोठ्या मिरवणुकीमुळे बराच काळ इतर मिरवणुका थांबून राहावे लागते. या पद्धतीचा कोणताही प्रकार आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.