शिरवळः येथील शिंदेवाडी फाट्याच्या येथे एका अनोळखी व्यक्तीने आपण पोलीस असल्याची बतावणी करीत वयोवृद्ध व्यक्तीजवळील ८५ हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज बोलण्यात भुलवत लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील एका हॅाटेलमधून एक वयोवृद्ध व्यक्ती बाहेर पडल्यानंतर त्यांना मोटार सायकलवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याच्या जवळ बोलवून, ” रात्री आम्ही एक माणुस पकडला आहे. त्याच्याकडे दोन लाख रुपये व एक पिस्तुल मिळून आली आहे. त्याची आम्ही चौकशी करीत आहोत.” अशी बतावणी आपण पोलीस असल्याचे भासविले.
तसेच रस्त्याने चाललेल्या एका अनोळखी व्यक्तीला बोलावून त्याची पिशवी चेक करण्यासाठी मागितली. त्या अनोळखी व्यक्तीने तुमचे ओळखपत्र दाखवा, असे म्हणाल्यावर त्याने फिर्यादी व त्या दुसऱ्या व्यक्तीला ओळखपत्र दाखविले. त्यानंतर अनोळखी इसमाचा रुमाल फिर्यादी यांच्या हातात देवून अनोळखी इसमाचे हातातील अंगठी व पाकीट फिर्यादी यांच्या हातातील रुमालात ठेवण्यास सांगून रुमालात बांधून त्या अनोळखी इसमाच्या खिशात ठेवण्यासाठी दिले.
त्यानंतर फिर्यादी यांचा रुमाल त्या अनोळखी इसमाच्या हातात देवून दोन्ही हातातील दोन अंगठ्या, गळ्यातील चैन खिशातील डायरी, साधा मोबाईल रुमालात ठेवण्यास सांगून रुमालाला गाठ मारुन फिर्यादी यांच्या खिशात ठेवण्यासाठी दिल्यावर अनोळखी इसमाने मोटार सायकलवरून पुणे बाजूला धूम ठोकली.
त्यानंतर फिर्यादी यांनी रुपालात पाहिले असता सोन्याची चैन व दोन सोन्याच्या अंगठ्या त्या चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर बाळु लक्ष्मण मोरे (वय 74 वर्ष व्यवसाय शेती रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा, जि. पुणे) यांनी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिली आहे. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.