साताराः पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर( pune banglore highway) साताऱ्यातील वाढेफाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीतून २१ प्रवासी सुखरुप आहेत. चालक-वाहकांने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले, त्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली.
राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगाराची स्वारगेट-सांगली ही शिवशाही बस पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गाने सांगलीकडे निघाली होती. दुपारी पावणेदोनच्या सुमारास साताऱ्यातील वाढे फाटा येथे ही बस आली असता बसमधून अचानक धूर येऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक-वाहकांना प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढले. तोपर्यंत गाडीने रौद्ररुप धारण केले होते. महामार्गावर आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. तर आसमंतात काळ्या धुराचे लोट उसळले होते.
या घटनेचे माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक वळवली. तसेच घटनेची माहिती मिळताच महामंडळाच्या सातारा विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना अन्य वाहनातून पुढे पाठविण्यासाठी मदत केली. या शिवशाहीला आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली याचा शोध यंत्रअभियंता विकास माने घेत आहेत.