इंदापूर/सचिन आरडे
येथील विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम शाळेत विद्यार्थ्यांसाठी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना 21 दिवसांसाठी टास्क दिले गेले. त्यामध्ये वाचन, स्वछता, मोबाईल शिवाय एक दिवस, इतरांना मदत इत्यादी गोष्टींचा समावेश होता. या उपक्रमामध्ये सहभागी झालेले एका विद्यार्थ्यांनीने तिचा अनुभव सांगितलेला आहे. त्याचाच हा संपादित अंश पुढीलप्रमाणेः
२१ दिवसांच्या आव्हानाने शालेय जीवनात एक नवी ऊर्जा निर्माण झाली
अवघड गोष्टींना समोरे जाण्यासाठी आणि आपल्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी आव्हानांचा सामना करणे आवश्यक असते. अशाच प्रकारच्या एका २१ दिवसांच्या आव्हानाने माझ्या शालेय जीवनात एक नवीन ऊर्जा निर्माण केली. या आव्हानात प्रत्येक दिवसाला एक नवीन कार्य देण्यात आले होते. काही वेळा मला शारीरिक क्षमतांची चाचणी करावी लागली, तर काही वेळा मानसिक आंतरप्रज्ञेची. सुरुवातीला वाटले की २१ दिवस फार मोठा कालावधी असणार आहे. परंतु जसजसे दिवस पुढे गेले, तसतसे माझ्या मनात एक आत्मविश्वास निर्माण झाला. पहिल्या दिवसाला मला एका दिवसाचे नियोजन कसे करावे याची सवय लागली.
….आणि मला वाचनाची आवड लागून योगाचे महत्व समजले
वेळेचे महत्त्व मला नव्याने कळले. दुसऱ्या आठवड्यात, रोजच्या वेगवेगळ्या आव्हानांमुळे माझी सर्जनशीलता वाढली. उदाहरणार्थ, एक दिवस “कुठल्याही उपकरणाशिवाय एक संध्याकाळ व्यतीत करा” हे आव्हान होते, ज्यामुळे मी एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि मला वाचनाची आवड निर्माण झाली. शेवटचे काही दिवस शारीरिक आव्हानांवर आधारित होते, ज्यात दररोज व्यायाम करणे, योगा करणे इत्यादी समाविष्ट होते. यामुळे माझ्या शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व कळले.
प्रत्येकाने स्वःताला नवी दृष्टी आणि प्रेरणा मिळवावी
२१ दिवसांचे हे आव्हान पूर्ण केल्यानंतर, मला स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल दिसले. माझा आत्मविश्वास वाढला, नियोजनक्षमता सुधारली आणि मला माझ्या मर्यादा ओलांडण्याची प्रेरणा मिळाली. प्रत्येक विद्यार्थ्याने अशा आव्हानांचा सामना करून स्वतःला नवी दृष्टी आणि नवीन प्रेरणा मिळवावी, अशी मला खात्री आहे. या उपक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती जगताप मॅडम आणि विद्यालयाचे समुपदेशक मच्छिंद्र साळुंखे सर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने हे आव्हान पूर्ण करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी त्यांची आभारी आहे.
कु. अदिती दादासाहेब बर्डे.
इयत्ता. ९वी. ब.
विद्या प्रतिष्ठानचे इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल(CBSE )इंदापूर.