परिंचेः बहिरवाडी (ता.पुरंदर) येथे “कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT)” संस्था माध्यमातून बाल विवाह रोखण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावपातळीवर बाल विवाह रोखण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेऊन प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीत बोलताना प्रकल्प प्रमुख दिपक त्रिपाठी म्हणाले की, “समाजातील शोषित, वंचित आणि दुर्बल घटकातील मुले व कुटुंबापर्यंत पोहचून त्यांच्या समस्यांच्या निवारण करण्याचा प्रयत्न संस्था करत असून, गेल्या ३४ वर्षांपासून योग्य हस्तक्षेप करीत २० लाखांपेक्षा अधिक व्यक्तींचे जीवन प्रभावित केले”. असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल गळंगे, रुपाली गळंगे, अंगणवाडी सेविका अलका वाशीलकर, आशा सेविका सुनिता ढगारे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिपक त्रिपाठी पुढे म्हणाले की, “भारतातील बालकांच्या हक्कांसाठी ‘ऍक्सेस टू जस्टीस’ हा प्रकल्प देश पातळीवर राबविला जात आहे. बालविवाह मुक्त भारत, बाल तस्करी, बालमजुरी प्रतिबंध आणि बाल लैंगिक शोषण प्रतिबंध या विषयाला अनुसरून प्रकल्पात बालकांच्या हक्कांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. कैलास सत्यार्थी चील्ड्रन्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने पूर्ण भारतामध्ये तसेच पुणे जिल्हा प्रशाशन यांच्या सहयोगाने “कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT)” संस्थेच्या वतीने बालकांच्या हक्कांसाठी बाल अत्याचार प्रतिबंध तसेच बाल विवाह मुक्त भारत मोहिमे अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जनजागृती कार्यक्रम राबवित येणार” असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून संस्थेने पुरंदर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायत व परिसरातील शाळांना बरोबर घेऊन ‘बाल विवाह मुक्त भारत’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. गावपातळीवर शासनाशी निगडित असलेल्या सर्व घटकांना एकत्र करून हे अभियान राबविण्यात येणाऱ्या आहे. बाल विवाह रोखण्यासाठी गावातील समस्त नागरिक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका एकत्र येत संबधित व्यक्तींचे सामोपदेशन करीत बालविवाह रोखतील व असे न केल्यास शासनास तक्रार करीत बाल विवाह रोखण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी धनराज खरे यांनी सांगितले.