पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत देशातील 12 औद्योगिक स्मार्ट शहरे तयार करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार 28,602 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तर या प्रकल्पामुळे या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाच्या रोजगाराच्या संधी देखील निर्माण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये नियोजित औद्योगिकीकरणाद्वारे सुमारे 10 लाख प्रत्यक्ष आणि 30 लाख लोकांसाठी अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार देशातील 12 औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये उत्तराखंडमधील खुरपिया, पंजाबमध्ये राजपुरा-पटियाला, महाराष्ट्रातील पुणे (दिघी), केरळमधील पलक्कड, उत्तर प्रदेशमधील आग्रा आणि प्रयागराज, बिहारमधील गया, तेलंगणात झहीराबाद, तर आंध्र प्रदेशमध्ये ओरकल आणि कोपर्थी आणि राजस्थानात जोधपूर-पाली येथे ही स्मार्ट शहरांचा समावेश असून ही शहरे स्मार्ट बनवली जाणार आहेत. या औद्योगिक शहरांची संकल्पना धोरणात्मकदृष्ट्या सहा प्रमुख कॉरिडॉरच्या जवळ तयार करण्यात आली आहे.